

पंजाबमध्ये दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार
पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाची युती होणार
२०२७ पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
दोन्ही पक्षात जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवाळानंतर पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये भाजप मोठ्या पक्षासोबत युती करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०२७ च्या निवडणुकांसाठी शिरोमणी अकाली दल आणि भाजपने पुन्हा एकदा हातमिळवणी केली असून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठक होऊन निर्णय अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजप एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या दोन्ही पक्षात युतीचा करार जवळपास निश्चित झाला असून जागावाटपाची वाटाघाटी सध्या सुरू आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्रिपद अकाली दलाला मिळेल, अशी अट घालण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप पूर्वीपेक्षा जास्त म्हणजेच ३५ ते ४० जागांवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगमात उतरवू शकतो. तर अकाली दल उर्वरित ६७ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर लवकरच भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी बठिंडा येथे एक मोठी सभा घेणार आहेत. या सभेला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. या सभेमध्येच या युतीची घोषणा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शाह यांनी २०२७ पर्यंत पंजाबमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यामुळे आता या युतीची जी चर्चा होत आहे ती खरी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
एकदा का भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती झाली तर अकाली दलाला केंद्र सरकारमध्ये एक मोठे गिप्ट मिळू शकते. सुखबीर बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांचे पीएम मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकते. त्यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी नियुक्ती होऊ शकते. रवनीत बिट्टू यांनंतर केंद्रामध्ये पंजाबचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही त्यामुळे निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा एक मोठा डाव ठरू शकतो.
अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही भाजपसोबतच्या युतीची शक्यता स्पष्टपणे नाकारलेली नाही. त्यांनी नुकताच एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे त्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. परंतु ज्यांची विचारधारा त्यांच्या विचारधारेशी जुळते, त्यांच्यासाठी युतीचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. त्यांच्या पत्नी, हरसिमरत कौर बादल यांनीही यापूर्वी असेच संकेत दिले होते. त्यामुळे पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाची युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.