Western Railway: मुंबईतून लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील वाढती गर्दी, वेटिंग लिस्ट आणि तिकीटाच्या समस्येमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १७ अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या दादर आणि जोगेश्वरी येथून धावणार आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पश्चिम रेल्वेला १०० नव्या गाड्या चालवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यांत नवीन गाड्या सुरू करण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात दादर स्थानकातून पाच, तर जोगेश्वरी टर्मिनसमधून १२ अशा एकूण १७ गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. या गाड्या नव्या वर्षात सुरू करण्यात येणार आहे.
दादर स्थानकातून पाच मेल- एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पूर्ण लांबीचा अतिरिक्त फलाट आणि रेल्वेमार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच दादर येथे प्रवास संपवणाऱ्या गाड्यांच्या देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या जागेवर कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे. यासाठी करी रोड येथील रेल्वेच्या जागेचा वापर केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आहे. या टर्मिनसमधून पहिल्या टप्प्यात १२ नवीन मेल- एक्सप्रेस सुरू करण्याची योजना आहे. डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत टर्मिनसचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. येथे गाड्या उभ्या करण्यासह प्राथमिक साफसफाईची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेसाठी ७६.४८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबई सेंट्रल स्थानकातून नवीन गाड्या सुरू करण्याऐवजी सध्या धावणाऱ्या गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या पाच फलाटांवर १५ ते २१ डब्यांच्या गाड्या थांबू शकतात. आता या फलाटांची लांबी वाढवून २४ डब्यांच्या गाड्यांसाठी करण्यात येणार आहे. या कामासाठी ३४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सप्टेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण होणार आहे.
मुंबईबाहेर वसई येथे कोचिंग टर्मिनस उभारण्यात येत आहे. येथून पहिल्या टप्प्यात १२ आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी १५ अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.