विरार स्थानकावर प्रवाशांनी AC लोकलविरोधात आंदोलन केले
८:२८ ची लोकल AC केल्याने संताप उसळला
काही काळ रेल्वे सेवा ठप्प झाली
प्रवाशांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली
तीव्र आंदोलनाचा इशारा
मनोज तांबे, विरार
विरार रेल्वे स्थानकावर आज सकाळी प्रवाशांनी अचानक आंदोलन छेडत स्थानिक रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प केली. सकाळी ८:२८ वाजताची विरार–चर्चगेट लोकल गाडी वातानुकूलित (AC) स्वरूपात रूपांतरित केल्याच्या निर्णयाविरोधात संतप्त प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांनी गाडी पुढे जाऊ दिली नाही. या घटनेमुळे काही वेळासाठी स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ मेपासून सकाळी ८:२८ वाजताची विरार–चर्चगेट ही लोकल गाडी वातानुकूलित स्वरूपात चालवली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, या निर्णयाचा मोठा फटका रोजच्या प्रवाशांना बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो प्रवासी याच वेळेच्या गाडीवर अवलंबून होते. अचानक झालेल्या या बदलामुळे त्यांच्या रोजच्या वेळापत्रकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
प्रवाशांनी सांगितले की, सकाळी ८:३३ वाजताची एक वातानुकूलित लोकल आधीच उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत फक्त पाच मिनिटांच्या अंतराने आणखी एक AC लोकल सुरू करणे हे सामान्य प्रवाशांवर अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे नॉन एसी लोकल गाड्यांची संख्या कमी झाली असून उर्वरित गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी, प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. याशिवाय, AC गाड्यांचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रारही प्रवाशांनी केली. त्यामुळे अनेकांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली असली तरी प्रवाशांमध्ये असंतोष कायम असल्याचे दिसून आले. प्रवाशांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन पुढील निर्णय काय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.