

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही
woman baby fall moving train kalyan station viral video : कल्याण रेल्वे स्थानकातील थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फलाटावर असलेले प्रवासी आणि आरपीएफ जवानामुळं मोठा अनर्थ टळला. फलाटावर आलेली ट्रेनमधून कडेवर बाळ घेऊन एक महिला प्रवासी उलट्या दिशेने उतरली. ट्रेन वेगात असल्यामुळं तिचा तोल गेला. तिच्या हातात बाळ होतं. ती फलाटावर पडल्याचे दिसताच तिथले प्रवासी आणि आरपीएफ जवानानं वायूवेगानं त्या दिशेने धाव घेतली आणि दोघांना बाजूला खेचलं. त्यामुळं बाळ आणि त्या महिलेचा जीव वाचला. काही सेकंदाचा विलंब झाला असता तर, मोठा अनर्थ घडला असता. देवदूत म्हणून धावून आलेले प्रवासी आणि आरपीएफ जवानाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर (Kalyan Railway Station Viral Video) मंगळवारी (२८ एप्रिल २०२६) संध्याकाळी ही घटना घडली. एक महिला प्रवासी कल्याण स्थानकात ट्रेनमधून उतरत होती. तिच्या हातात अवघ्या एका वर्षाचं बाळ होतं. फलाटावर आलेल्या ट्रेनचा वेग कमी होता. त्यामुळं कडेवर बाळ घेऊन या महिलेनं फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण ती उलट्या दिशेने उतरली. ती खाली कोसळली. काही सेकंद ती फलाटावर फरफटत गेली.
त्याचवेळी फलाटावर काही प्रवासी होते. त्यांच्या बाजूलाच रेल्वे पोलीस होते. बाळ कडेवर असलेली महिला फलाटावर ट्रेनमधून पडल्याचे त्यांच्या लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ट्रेनच्या दिशेने धाव घेतली. तिथल्या दोन प्रवाशांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तर आरपीएफ जवानानं यांनी त्या महिलेला आणि तिच्याकडील बाळाला बाजूला ओढून घेतले. यामुळे महिला आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले.
अंतिमा शुक्ला ही महिला आपल्या एक वर्षीय बाळासह प्रयागराज येथून ट्रेनने मुंबईत येत होती. ट्रेन कल्याण स्थानकात आली. फलाटावर आलेल्या ट्रेनचा वेग कमी होता. त्यामुळं या महिलेने बाळाला कडेवर घेऊन फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. उलट्या दिशेने उतरल्यानं तिचा तोल गेला आणि ती बाळासह फलाटावर पडली. तेथे काही प्रवासी होते. तसेच रेल्वे पोलीसचे एएसआय हेमंत भरगुडे हे कर्तव्यावर होते. त्यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न करता धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.
ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत करण्यात आलेल्या या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे आई आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून, आई आणि बाळाला वाचवणाऱ्या आरपीएफ जवानाचं कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.