मुंबईत भीषण अपघात
साकीनाका येथे सिमेंट मिक्सरची दुचाकीला धडक
भीषण अपघातामध्ये ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
अपघातामध्ये मुलीचे वडील गंभीर जखमी झाले
अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात ८ वर्षीय अहाना शेख या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या वडिलांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातामध्ये अहाना रस्त्यावर पडली यावेळी ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातामध्ये अहानाचा जागीच मृत्यू झाला तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. वडिलांच्या डोळ्यासमोरच अहानाने प्राण सोडले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबईतील जड वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १५ मे रोजी अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरातील खन्ना इस्टेटजवळ घडला. अहाना शेख ही आपल्या वडील मोहम्मद रफी शेख यांच्यासोबत स्कूटरवरून घरी परतत होती. मोहम्मद रफी शेख हे एसी रिपेअरचे काम करतात. चार दिवसांपूर्वी अहाना आपल्या मावशी नजहमीन शेख यांच्या जरीमारी येथील घरी आली होती. तिला घेण्यासाठी तिचे वडील गेले होते.
दोघे अंबर हॉटेलजवळ पोहोचले असता, बाजूने जात असलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने अचानक डावीकडे वळण घेतले. त्याचवेळी ट्रकच्या शेजारी स्कूटर जात होती. अचानक वळण घेतल्याने ट्रकची स्कूटरला जोरदार धडक बसली. या धडकेत मोहम्मद रफी शेख हे रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले, तर अहाना उजव्या बाजूला फेकली गेली आणि दुर्दैवाने ट्रकच्या मागील डाव्या चाकाखाली आली.
या अपघातात अहानाच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिचे वडील मदतीसाठी आक्रोश करत होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत ट्रक थांबवला आणि जखमी अहानाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी ६.४५ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, जड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
साकीनाका पोलिसांनी ट्रक चालक २७ वर्षीय सिराजुल कोरमुद्दीन इस्लाम याला ताब्यात घेतले आहे. तो कुर्ला पूर्व येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर अंधेरी पूर्व आणि साकीनाका परिसरातील जड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अरुंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रक आणि डंपरची वाहतूक होत असून, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटींमुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. मुंबईत गेल्या काही महिन्यांत जड वाहनांमुळे झालेल्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.