रूपेश पाटील, पालघर प्रतिनिधी
Palghar Train Accident : पालघर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर पूर्वेतील जुना पालघर भागातील जैन मंदिराजवळ ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांच्या भीतीने पळत असताना हे तरुण रेल्वे रुळांवर गेले आणि त्याच वेळी मालगाडीची धडक बसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या किंवा अटकेच्या भीतीने हे तरुण रेल्वे रुळांच्या दिशेने पळत सुटले होते. त्याच वेळी रुळावरून जाणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला, असा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या आरोपामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.