दिवाळीपूर्वी साखरेच्या दरात मोठी वाढ
साखर प्रतिकिलो ५४ रुपयांवरून ५९ रुपयांवर
दिवाळीपूर्वी दर ६० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सर्वसामान्यांच्या घरखर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी वाढत असतानाच साखरेच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. पुण्यात गेल्या दहा दिवसांत किरकोळ बाजारात साखरेच्या दरात प्रतिकिलो ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पाच किलो साखरेसाठी २५ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. आगामी काळात मागणी आणखी वाढल्यास दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशनच्या माहितीनुसार, घाऊक बाजारात साखरेचा दर ५२ रुपये प्रतिकिलो होता. त्यात वाढ होऊन आता हा दर ५४ रुपये झाला आहे. दुसरीकडे, किरकोळ बाजारात साखरेची किंमत ५४ रुपयांवरून थेट ५९ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्यासाठी साखरेची मागणी वाढत असल्याने किरकोळ दर ६० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
साखरेच्या दरवाढीमागे केवळ सणासुदीची मागणी हे एकमेव कारण नाही. साखर उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ आणि उसापासून साखर तयार होण्याचे प्रमाण कमी होणे, यांचाही बाजारभावावर परिणाम होत आहे. साखर कारखान्यांकडून सध्या सुमारे ५० रुपये प्रतिकिलो दराने साखर विकली जात असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात हा दर सुमारे ३९ रुपये प्रतिकिलो होता. त्यामुळे यंदा उत्पादन खर्चातील वाढीचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील चालू हंगामात साखर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, उसाच्या तुलनेत साखरेचे उत्पादन कमी मिळत असल्याने पुरवठा आणि दरांवर दबाव निर्माण होऊ शकतो.
दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये साखरेच्या उपलब्धतेबाबत चिंता असली, तरी सध्या दिलासादायक चित्र आहे. महाराष्ट्राचे साखर आयुक्त संजय कोलते यांच्या माहितीनुसार, राज्यात नऊ लाख टनांहून अधिक साखरेचा साठा उपलब्ध आहे. तसेच साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळपही सुरू झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सणासुदीतील मागणी आणि उत्पादन खर्च यामुळे दर किती वाढतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.