

उल्हासनगरमध्ये २ महिलांची धिंड काढली
महिलांवर अमानुष अत्याचार प्रकरण
महिलांचे केस कापून मारहाण
उल्हासनगर पोलिसांची कारवाई
उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून काही महिलांवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांचे केस कापणे, गळ्यात चपलांचा हार घालणे, मारहाण करणे तसेच त्यांची जवळपास २ किलोमीटरपर्यंत दिंड काढण्यात आल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पुरेसे घेतले नसल्याचा आरोप होत आहे.
उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरात वाघेरी आणि राजपूत कुटुंबीयांमध्ये जुना वाद सुरू आहे. हा वाद नेमका कशामुळे आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. आरोपानुसार, वाघेरी कुटुंबीयांनी राजपूत कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली. त्यानंतर घरातील महिलांना जबरदस्तीने बाहेर ओढून आणण्यात आले. यानंतर महिलांचे केस कापण्यात आले. त्यांच्या गळ्यात चपलांचे हार घालण्यात आले तसेच त्यांना मारहाण करण्यात आली.
एवढेच नव्हे तर परिसरातून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत त्यांची दिंड काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारावेळी अनेक नागरिक बघ्याच्या भूमिकेत असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतक्या गंभीर आणि संतापजनक घटनेनंतरही पोलिसांनी कठोर आणि तातडीची कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.