पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर काही पक्षांमध्ये पक्षप्रवेशही सुरु झाले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील अजित पवार गटातील काही माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचर्चेदरम्यान, त्यांनी मोठं विधान केलं आहे. 'विधानसभेआधीच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असा दावा बेनके यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट घडली. या भेटीला खुद्द शरद पवार यांनीही दुजोरा दिला आहे. या भेटीवर शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'ते आता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत. याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे यावर फार चर्चा नको, असं शरद पवारांनी म्हटलं.
शरद पवारांच्या भेटीवर भाष्य करताना अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही भाष्य केलं आहे. 'विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड-दोन महिन्यांचा अवधी आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना काहीही होऊ शकतं. त्याच्यावर आता भाष्य करून अर्थ नाही. महायुती म्हणून आम्ही पुढे जात आहोत. त्यावेळी जागावाटपावरून काहीही होऊ शकतं. शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यात मी एक छोटा घटक आहे. मी एक जुन्नरचा एक लोकप्रतिनिधी आहे. पुढे काही होऊ शकतं, मी सांगू शकत नाही, असे बेनके यांनी म्हटलं.
शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली, यावर बोलताना बेनके म्हणाले, 'मतदारसंघात धरणात पाणी भरलेलं नाही. काल जुन्नरमध्ये भीषण अपघात झाला. त्यावर चर्चा झाली'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.