

पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा
3 लाखांत B.Com डिग्री विक्रीचा आरोप
पुणे विद्यापीठात बोगस डिग्री रॅकेट सुरू आहे का ?
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...बोगस डिग्रीचं हे बिंग नेमकं कसं फुटलं पाहूयात.
रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्यानं त्याच्या अन्य चार साथीदारासह महेश कदम यांना तीन लाख रुपयांत बीकॉम डिग्री सर्टिफिकेट देण्याचे कबूल केले. मात्र मुखेकरनं वेगवेगळ्या वर्षांच्या चार डिग्री सर्टिफिकेट दिल्यानं कदम यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला आणि बोगस डिग्री विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय.
दरम्यान यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र महिना उलटला तरी संबधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप एका तक्रारदारानं केलाय. दुसरीकडे साम टिव्हीनं ऑपरेशन बोगस डिग्रीला वाचा फोडल्यानंतर पुणे विद्यापीठाला जाग आली. विद्यापीठाच्या प्र- कुलगुरुंनी सत्यशोधन समिती स्थापनेची घोषणा करून अहवाल आल्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.
एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट उघड झालं खरं. मात्र अधिकारी आणि कर्मचारीच लाखो रुपये घेऊन सर्रास बनावट डिग्री सर्टिफिकेटची विक्री करत असल्यामुळे पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आलाय. आता रमेश मुखेकर आणि अन्य कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली असली तरी कारवाई करण्यास इतका उशीर का झाला? या गंभीर तक्रारीकडे कुलगुरूंनी दुर्लक्ष का केलं? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र विद्यापीठातली कोणती बडी धेंड हे रॅकेटच चालवताय याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.