

मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत सरकारवर जोरदार टीका केली. बदलत्या काळानुसार विद्यार्थी संघटनांनीही बदलणं गरजेचं असल्याचं सांगताना त्यांनी 'जेन झी' पिढीला समजून घेण्याचा सल्ला दिला. याशिवाय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही उल्लेख करत भाजपच्या ट्रोल संस्कृतीवर टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, "मी ज्यावेळी कामाला सुरुवात केली, तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. तेव्हाचे विषय वेगळे होते, आजचे विषय वेगळे आहेत. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते आणि आजचे विद्यार्थीही वेगळे आहेत. आता 'जेन झी'ची पिढी आहे. या मुलांचं म्हणणं काय आहे, त्यांना नेमकं काय हवं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे."
यावेळी त्यांनी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनाही विशेष आवाहन केलंय. "माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, 'जेन झी' म्हणजे फक्त इंग्रजी बोलणारी मुंबई, पुणे किंवा दिल्लीतील मुलं नाहीत. १९९७ नंतर जन्माला आलेली मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही आहेत. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आशा आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. जुन्या कल्पना आता सोडल्या पाहिजेत," असे राज ठाकरे म्हणाले.
यानंतर त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. "एका व्यक्तीने आयुष्यभर केसांना तेल चोपडलं, पण बुद्धी आली नाही. आणि हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
याच भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचाही उल्लेख केला. "मी पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यांनी म्हटलं की, ज्या प्रकारचे व्हिडीओ आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती अयोग्य आहे. मला ते मान्य आहे. अशी भाषा वापरली जाऊ नये. पण मला नरेंद्र मोदींना एवढंच सांगायचं आहे की, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. गेल्या १२ वर्षांत याची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या ट्रोल टीमने जे काही सुरू केलं, त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही जे पेराल, तेच उगवतं," अशी टीका त्यांनी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणतात की, 'त्या मुलांना मी माफ केलं. पण गेल्या १२ वर्षांत तुमच्या पक्षातील लोकांनी जे केलं, त्याबद्दल माफी कोण मागणार? जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंची डोकी फोडली गेली, त्याचं काय?"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.