Mumbai rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा धुमाकूळ; रस्ते पाण्याखाली- नागरिकांचे हाल, पुढचे २ दिवस सतर्कतेचे

मुंबई, ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Mumbai rain
Mumbai rainsaam tv
Published On

मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे या सर्व भागांमध्ये जोरदार सरी कोसळतायत. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा तीव्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

अंधेरी परिसरात साचलं पाणी

मुंबईतील सर्वात गंभीर परिस्थिती अंधेरी परिसरात निर्माण झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात, सुमारे चार ते पाच फूट पाणी साचल्याने सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गाडी चालकांना मोठ्या प्रमाणावर वळसा घेऊन प्रवास करावा लागत असून परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढलीये.

लोकल ट्रेनलाही बसला फटका

मुंबईतील या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेलाही बसला आहे. शहरातील तिन्ही प्रमुख लोकल मार्गांवर गाड्या उशीराने धावतायत. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा साधारण 15 ते 20 मिनिटांनी उशिराने सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवरील गाड्या 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावतायत.

Mumbai rain
Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत मुसळधार, तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने

ठाण्यातही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

ठाण्यातही मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला होता. सध्या काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी शहरात आतापर्यंत 137.12 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीये. मात्र हवामान विभागाने पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून 2 आणि 3 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातही पावसाने मोठा तडाखा दिला आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने पहाटेपर्यंत सातत्य ठेवलं. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाने परिस्थिती बिकट केली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील साईनगर परिसर, कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकली परिसर तसंच कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौक या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Mumbai rain
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कल्याण उंबर्डे गावातील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेच्या आवारात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी निर्माण झाल्या असून पालकांचीही मोठी तारांबळ उडाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com