पुण्यात ऑनलाइन गेमच्या वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
रिल्सस्टारने हल्ला केल्याची माहिती
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
पीडित कुटुंबीयांनी जनता दरबारात सुनेत्रा पवारांकडे न्यायाची मागणी केली
सुनेत्रा पवारांचे आयुक्तांना तातडीचे निर्देश
ऑनलाईन गेमच्या वादातून पुण्यातील एका तरुणावर रिलस्टारने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. दरम्यान पीडित मुलाच्या आई वडिलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे न्याय मिळवा यासाठी मागणी केली. सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधत कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेम खेळण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हल्ल्यात झाले. संशयित आरोपींनी संबंधित तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित तरुणाचे आई-वडील आपल्या मुलाला न्याय मिळावा, या अपेक्षेने जनता दरबारात आले होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच संबंधित कागदपत्रे, फोटो आणि सोशल मीडिया लिंक्सही पुरावे म्हणून सादर केल्याचे सांगण्यात आले. संशयित आरोपींपैकी काही जण सोशल मीडियावर ‘रील स्टार’ असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. तसेच त्यांच्याविरुद्ध मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला.
कुटुंबीयांची व्यथा ऐकल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी विलंब न करता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. या प्रकरणाचा सखोल तपास करून उपलब्ध सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. “मुलावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. तो बचावला असला तरी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करा. आरोपींची माहिती आणि सर्व पुरावे पोलिसांना पाठवले जात आहेत. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशा सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तरुणाईवर हिंसक ऑनलाइन गेम्सचा होणारा परिणामही चिंतेचा विषय असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा तरुणांना चुकीच्या दिशेने नेणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.