नाशिकच्या मुंबईनाका परिसरात भीषण अपघात
ट्रकची दुचाकीला मागून जोरदार धडक
३३ वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
ट्रक चालक पसार
ऐन गणेशोत्सवात नाशिक शहरात एका भीषण अपघात घडला. मुंबईनाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ३३ वर्षीय इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. किरण नरोडे असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून हिट अँड रनच्या वारंवार घडणाऱ्या घटनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण नरोडे हे मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ते कंपनीत आले होते. कंपनीतील काम आटोपून ते अंबडहून मुंबईनाक्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. याचदरम्यान मुंबईनाका परिसरात मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किरण हे रस्त्यावर कोसळले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणांतच ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्याच्या आधारे पसार झालेल्या ट्रकचा आणि चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाने वाहन का थांबवले नाही, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या आनंदासाठी कंपनीत आलेल्या किरण यांच्यावर काळाने अचानक घाला घातल्याने नरोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणाच्या उत्साहात असलेल्या कुटुंबाला या दुर्दैवी घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू असून, चालक सापडल्यानंतर अपघाताबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.