

शिरूर तालुक्यातील वरूडे येथे घडलं हत्याकांड
झोपलेल्या व्यक्तीचा खून केल्याची घटना
भांडणाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची कबुली
रोहिदास गडगे, साम प्रतिनिधी
दोन वर्षापूर्वी झालेल्या एका भांडणाचा सूड उगवत एका अल्पवयीन मुलाने झोपलेल्या एका व्यक्तीचा खून केला आहे. शिरूर तालुक्यातील वरूडे येथेही धक्कादायक घटना घडली आहे. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत उलगडा करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. बाळासो बबन तांबे (वय ४३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरूडे येथील बाळासो तांबे यांची घराबाहेर झोपेत असताना कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान गावातीलच एका अल्पवयीन मुलाने दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा आणि अलीकडील वादाचा सूड उगवत हा खून केल्याची कबुली दिली.
हाती आलेल्या माहितीनुसार,बाळासो बबन तांबे उकाड्यामुळे घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात तांबे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि संशयितांची माहिती तपासली. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याची पालकांसमक्ष चौकशी केली असता त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली.
अल्पवयीन मुलगा आणि बाळासो तांबे यांचे दोन वर्षापूर्वी भांडण झाले होते. घटनेच्या काही दिवसांपूर्वी सुद्धा दोघांमध्ये वाद झाला होता. याचा सूड घेण्याचा म्हणून तांबे यांचा खून केल्याचे तपासात समोर आले. राग अनावर झाल्याने झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे. सदरची कामगिरी ही संदिपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक पुणे, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षिरसागर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.