इफ्तार पार्टी करणाऱ्या तरुणांवर जीवघेणा हल्ला
पुण्यातील सासवडमधील धक्कादायक घटना
या हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी झाले
या प्रकरणी सासवड पोलिसांनी १२ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं
पुण्यामध्ये इफ्तार पार्टीची तयारी करणाऱ्या तरुणांवर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे सध्या सासवडमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी १२ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सासवड येथे रमजान महिन्यादरम्यान रोजा सोडण्याची तयारी करणाऱ्या मुस्लिम तरुणांच्या एका गटावर जमावाने कथितरित्या हल्ला केला. रक्त येईलपर्यंत या तरुणांना मारहाण करण्यात आली. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑस्करवाडी भागात एका तलावाजवळ घडली.
पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २५ वर्षीय फिरोज जावेद सय्यद या तक्रारदारासह त्याचे सुमारे दहा मित्र तलावाजवळ जमले होते आणि ते उपवास सोडण्याची तयारी करत होते. त्याचवेळी सुमारे १०० जणांचा एक गट दुचाकींवरून घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी या तरुणांची चौकशी करण्यास सुरुवात केली. या गटाने तरुणांना, 'ही जागा तुमची मालकीची आहे का?' असा प्रश्न विचारला. तसेच त्यांना त्यांच्या डोक्यावरील टोप्या काढण्यास सांगितले आणि 'तुम्ही विशिष्ट पद्धतीने वेशभूषा करून येथे का आला आहात?' अशी विचारणा केली.
जमावाने मुस्लिम तरुणांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर काठ्या आणि कोयता यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेत चार ते पाच तरुण जखमी झाले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र त्यातील काही जणांना पुढील उपचारांसाठी त्यांच्या घरांजवळील रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यंत १० ते १५ जणांना ताब्यात घेतलं. फरार आरोपींचा पोलिस शोध गेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.