Pradeep Jadhav Case: प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरण, जे.पी गर्ग यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Pradeep Jadhav Case: प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने जे.पी. गर्ग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
Pradeep Jadhav Case
Pradeep Jadhav CaseSaam Tv
Published On: 

Pradeep Jadhav Case: मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणात जे.पी. गर्ग यांना मोठा धक्का दिला आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीत करण्यात आलेले छळाचे आरोप, कथित हस्तलिखित राजीनाम्याचे प्रकरण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने गर्ग यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळण्याच्या दिलेल्या निर्णयाविरोधात गर्ग यांनी दाखल केलेले फौजदारी अपील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गर्ग यांना १० दिवसांची अंतरिम मुदत देण्यात आली आहे. विराज प्रोफाइल्स प्रा. लि., एमआयडीसी बोईसर येथे वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप एस. जाधव यांनी १९ जून २०२६ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.पी. गर्ग यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pradeep Jadhav Case
Famous Director Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; बाथरुममध्ये पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रदीप जाधव हे अनुसूचित जातीचे सदस्य असल्यामुळे त्यांना पदोन्नती दिली जात नव्हती. त्यामुळे त्यांनी २०२५ मध्ये कंपनीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. मात्र, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी पुन्हा बोलावल्यानंतर ते २७ डिसेंबर २०२५ रोजी विराज प्रोफाइल्समध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांचा पुन्हा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(v) अंतर्गत आरोपांचा समावेश आहे.

Pradeep Jadhav Case
Ajay Devgn: गुटखा जाहिरात प्रकरणी अजय देवगणच्या अडचणी वाढल्या? थेट हायकोर्टात धाव, नेमकं कारण काय?

आत्महत्येच्या चिठ्ठीत छळाचे आरोप

उच्च न्यायालयाने प्रदीप जाधव यांची आत्महत्येची चिठ्ठी काळजीपूर्वक वाचली. या चिठ्ठीत जे.पी. गर्ग यांच्याकडून वारंवार छळ आणि अपमान होत असल्याचे आरोप करण्यात आले होते. आपल्यातील चुका शोधून त्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याने आपल्यासोबत चुकीचे राजकारण केले जात असल्याचेही प्रदीप जाधव यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. या आरोपांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

वंदना जाधव यांची न्यायासाठी हाक

दरम्यान, प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव आणि कुटुंबीयांनी जे.पी. गर्ग यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी वंदना जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच विराज प्रोफाइल्सचे मालक नीरज कोचर हे जे.पी. गर्ग यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही जाधव कुटुंबीयांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने आता जे.पी. गर्ग यांच्याविरोधातील पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी दिलेली १० दिवसांची अंतरिम मुदत आणि प्रकरणातील पुढील तपास या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का? जे.पी. गर्ग यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार? या प्रश्नांची उत्तरे आता पुढील न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेतून समोर येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.