Ajay Devgn: बॉलिवूडमधील तीन लोकप्रिय अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ सध्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत. गुटखा आणि इलायची ब्रँडच्या जाहिरातीत सहभागी झाल्यामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या तिन्ही कलाकारांना नोटीस बजावली होती. या नोटीसला तिन्ही कलाकारांनी आपली उत्तरे सादर केली आहेत. मात्र, अभिनेता अजय देवगण याने आता थेट कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. त्याने महाराष्ट्र FDA ने बजावलेल्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे.
अजय देवगणने FDA च्या नोटीसला दिलं आव्हान
महाराष्ट्र FDA ने अजय देवगणला एका गुटखा आणि इलायची ब्रँडच्या जाहिरातीतील सहभागाबाबतची कारणे द्या अशी नोटीस बजावली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित गुटखा उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा प्रशासनाला संशय आहे. या नोटीसच्या विरोधात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, त्याने नेमक्या कोणत्या कायदेशीर आधारावर या नोटीसला आव्हान दिलं आहे आणि न्यायालयाकडे कोणता दिलासा मागितला आहे, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शाहरुख खान आणि टायगर श्रॉफनेही सादर केलं उत्तर
अजय देवगणसोबतच शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही महाराष्ट्र FDA कडून नोटीस पाठवण्यात आली होती. संबंधित जाहिरातीत सहभागी होण्यामागचं कारण काय आणि त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई का करू नये, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितलं होतं. या तिन्ही कलाकारांनी FDA कडे आपली उत्तरं सादर केली आहेत. महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी दोन कलाकारांनी वैयक्तिक सुनावणीची मागणी केली होती. ही सुनावणीही पूर्ण झाली आहे. मात्र, कलाकारांनी आपल्या उत्तरांमध्ये नेमकी काय भूमिका मांडली, याची माहिती समोर आलेली नाही.
गुटखा जाहिरातीवरून नेमका वाद काय?
या प्रकरणातील मुख्य मुद्दा म्हणजे सरोगेट ॲडव्हर्टायझिंग. संबंधित ब्रँडच्या गुटखा उत्पादनाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र, याच ब्रँडच्या इलायचीची जाहिरात करून प्रतिबंधित उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा FDA ला संशय आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये बंदी असलेल्या उत्पादनाऐवजी दुसऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून ब्रँडची जाहिरात केली जाते.
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत FDA ची कारवाई
महाराष्ट्र FDA ने या प्रकरणात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचा आधार घेतला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि प्रतिबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष प्रचाराबाबत प्रशासनाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित कलाकारांना सोशल मीडिया अकाउंटवरून या जाहिरातींशी संबंधित मजकूर हटवण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.