

नालासोपाऱ्यात लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
नालासोपारा पूर्वेकडे नाल्यात आढळला मृतदेह
पोलिसांकडून तपास सुरू आहे
वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनमधून पडून महिलेचा मृत्यू
धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा येथे ही घटना घडली. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या कॅपिटल मॉल परिसरातील गटाराच्या नाल्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास काही नागरिकांना हा मृतदेह दिसून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून तो लोकलमधून पडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आचोळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी दिली.
कॅपिटल मॉल परिसरातील गटाराच्या नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच आचोळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. नाल्यात मृतदेह असल्याने तो बाहेर काढण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाची मदत घेण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
प्राथमिक तपासात संबंधित तरुण लोकलमधून पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नालासोपारा स्थानकातून लोकल सुटल्यानंतर हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, मृत तरुण कोणत्या लोकलमधून प्रवास करत होता, तो कुठून कुठे जात होता, तसेच तो नेमका लोकलमधून कसा पडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच घटनेबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाला. ही लोकल कसाऱ्याच्या दिशेने जात होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे महिला दरवाज्याजवळ उभी होतीी. त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.