

कांदिवलीमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
अमूल आणि गोकुळच्या नावाखाली भेसळयुक्त दूधाची विक्री
समतानगर पोलिसांनी ७४ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल
नामांकित कंपन्यांच्या दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते दूध ग्राहकांना विक्री करण्याचा प्रकार कांदिवली पूर्व परिसरात समोर आला आहे. समतानगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ अटक केली असून, त्याच्याकडून अमुल आणि गोकुळ कंपनीचे तब्बल ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्याचे साहित्य तसेच दोन्ही कंपन्यांच्या नावाच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ईरन्ना लिंगय्या गोपनाबोनई (वय ४८, रा. रामउजागर चाळ, लक्ष्मीनगर, दामुनगर लास्ट बस स्टॉप, कांदिवली पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना आरोपी आपल्या राहत्या घरात नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून ते ग्राहकांना विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे समतानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.५० वाजता आरोपीच्या घरावर छापा टाकला.
यावेळी आरोपी अमुल आणि गोकुळ कंपनीच्या एक लिटर तसेच अर्धा लिटरच्या दुधाच्या पॅकेटमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत घराची झडती घेतली. या कारवाईत ७४ लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. दूध भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच अमुल आणि गोकुळ कंपनीच्या नावाच्या बनावट रिकाम्या पिशव्याही पोलिसांच्या हाती लागल्या. त्यामुळे नामांकित ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून भेसळयुक्त दूध बाजारात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध BNS कलम २७४, ३४५(३), ३४७(१), ३१८(४), ३३६(३), ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-३, गजानन शिवलिंग राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, समतानगर विभाग कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-३, गजानन शिवलिंग राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, समतानगर विभाग कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक धनंजय कावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ भोये, सहायक फौजदार रोजेश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, पोलीस हवालदार अतुल ननवरे, पोलीस शिपाई दौलत साळुंके, पोलीस शिपाई निलेश भिकले आणि पोलीस शिपाई अशोक गाढवे यांनी सहभाग घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.