मुंबईत थरार! भरधाव कारनं 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू; कार चालकाला VIP ट्रीटमेंट?

Malad Car Accident: मुंबईतील मालाड पश्चिम येथे भरधाव कारने सुमारे २० जणांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात महिला वकील अॅड. प्रियांका सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.
Malad SV Road car accident woman lawyer Priyanka Satra death
Malad SV Road car accident woman lawyer Priyanka Satra deathsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: मालाड पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील मामलतदार वाडी रोड जंक्शनजवळ रविवारी (३० ऑगस्ट) रात्री सुमारे आठच्या सुमारास भरधाव कारने रस्त्यावरील नागरिकांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २० जणांना कारने धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, मालाड पश्चिम येथील रहिवासी असलेल्या अॅड. प्रियांका मयंक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Malad SV Road car accident woman lawyer Priyanka Satra death
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे २० दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार मालाड सबवेच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. मामलतदार वाडी रोड जंक्शनजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावर उपस्थित नागरिकांना जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर रस्त्यावर जखमी नागरिकांची गर्दी आणि मदतीसाठी सुरू झालेल्या आरडाओरड्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Malad SV Road car accident woman lawyer Priyanka Satra death
CM फडणवीसांकडून DJ बंदीचे संकेत, नागरिकांना केलं मोठं आवाहन

महिला वकिलाचा दुर्दैवी मृत्यू

या भीषण अपघातात अॅड. प्रियांका मयंक सत्रा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जखमीच्या डोक्याला सुमारे २० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची वैद्यकीय स्थिती याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अपेक्षित आहे.

Malad SV Road car accident woman lawyer Priyanka Satra death
भाजपच्या बैठकीत अचानक तुकाराम मुंढेंच्या एफडीएची रेड, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अपघाताची नेमकी कारणे, वाहनाचा वेग आणि चालकाची स्थिती याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या अपघातानंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी चालकाला पोलीस ठाण्यात कथितपणे विशेष सुविधा देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

आरोपीला कथित ‘VIP ट्रीटमेंट’?

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, आरोपीला पोलीस ठाण्यात मोबाइल फोन वापरण्याची तसेच खुर्चीवर बसण्याची सुविधा देण्यात आली. रात्री सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आरोपीला वैद्यकीय तपासणीच्या कारणास्तव लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले आणि पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या वातानुकूलित खोलीत बसवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. याबाबत मालाड पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आरोपीला नेमक्या कोणत्या परिस्थितीत लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले आणि त्याला कोणत्या सुविधा देण्यात आल्या, याबाबतचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

कुटुंबीयांच्या चार प्रमुख मागण्या

या प्रकरणात मृत अॅड. प्रियांका सत्रा यांच्या कुटुंबीयांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. आरोपीविरुद्ध योग्य आणि कठोर कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, कथित विशेष वागणुकीची स्वतंत्र चौकशी करावी, पोलिसांकडून प्रथमदर्शनी हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि अपघातस्थळापासून पोलीस ठाण्यापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून त्याची तपासणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तपासातून सत्य समोर येणार

या भीषण अपघातात भरधाव कारने नेमक्या किती नागरिकांना धडक दिली, वाहनाचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले आणि अपघाताच्या वेळी चालकाची नेमकी स्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच आरोपीला पोलीस ठाण्यात कथित विशेष सुविधा देण्यात आल्याच्या आरोपांचीही चौकशी होणे अपेक्षित आहे.

सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनाची तांत्रिक तपासणी आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे या दुर्घटनेचे संपूर्ण वास्तव समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृत अॅड. प्रियांका सत्रा यांच्या कुटुंबीयांसह जखमींच्या नातेवाइकांनी या प्रकरणात निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या आरोपी चालक हा मालाड पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरोपी चालकाने मद्यपान केले होते का याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच खुलासा होणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com