

मुंबई लोकलमध्ये घडली पुन्हा धक्कादायक घटना
दिव्यांग तरुणाला झाली मारहाण
दिव्यांग तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
मयुर राणे, साम टीव्ही
मुंबई लोकलमध्ये शनिवारी रात्री एका महिला प्रवासी दगडफेकीत जखमी झाल्याची घटना ताजी असताना आता दिव्यांग तरुणाला टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. दिव्यांग तरुणाच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांकडून या टोळीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.४५ वाजता सुटलेल्या कर्जत फास्ट लोकलच्या दिव्यांगासाठी राखीव सहाव्या डब्यात एका दिव्यांग प्रवाशावर ५ ते ६ जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना घडली. दिव्यांगाच्या राखीव डब्यात भायखळा स्थानकावरून चढलेल्या काही सक्षम प्रवाशांनी दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त असलेल्या व्यक्तीला मारहाण केली.
टोळीने दिव्यांग व्यक्तीला खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. तसेच त्याला दरवाजाजवळ ओढत नेले. धावत्या लोकल ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही मारहाणीची घटना दादर ते कुर्ला दरम्यान घडली.
मारहाण करणारे आरोपी कुर्ला स्टेशन आल्यानंतर पसार झाले. तर जखमी दिव्यांग प्रवासी हा घाटकोपर स्टेशनवर उतरला. या गंभीर घटनेनंतरही कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मारहाणीच्या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा वावर वाढत आहे. परंतु आरपीएफ आणि जीआरपी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याही आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे. मारहाणीच्या वेळी आरपीएफ आणि जीआरपी जवानाची उपस्थिती कुठे आहे, असा सवाल प्रवासी करत आहेत.
तत्पूर्वी, संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जातेय. दिव्यांग तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.