मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार व्हावा यासाठी मुंबईच्या रेल्वे सेवेत एसी लोकलचा समावेश करण्यात आला. परंतु याच एसी लोकलमुळेच मुंबईकरांचा श्वास कोंडला. एसी लोकलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे टिटवाळा - सीएसएमटी एसी लोकलची कुलींग सिस्टीम बंद पडलीआणि तीन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, टिटवाळा - सीएसएमटी एसी लोकलबाबत सोमवारी घडलेल्या घटनेचीसंपूर्ण तपासणी कुर्ला कारशेडमध्ये चालू आहे. तुडुंब गर्दी असल्याने चालत्या लोकलमध्ये एसी अचानक बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे ट्र्रॅक्शन सुपरवाइजर एसी लोकलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे तात्काळ दुरूस्ती करणे शक्य झाले नाही. असा प्रसंग पुन्हा घडला तर लोकल पुढील स्थानकावर तात्काळ थांबवली जाईल. त्यामुळे प्रवाशांना पुढील स्थानक येईपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.
सोमवारी सकाळी ८.३३ वाजता टिटवाळा - सीएसएमटी एसी लोकलचा एसी दिवा - मुलुंड स्थानकादरम्यान अचानक बंद पडला. मुलुंड स्थानक यायला जवळपास १५ ते २० मिनिटे बाकी होते. चाकरमान्यांची कामावर जाण्याची लगभग असल्यामुळे एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती आणि यातच एसी अचानक बंद पडल्याने तीन प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. एका प्रवाशाला हाय बीपीचा त्रास असल्याने त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.