मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लोअर परळचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
लोअर परळमधील ५५७ रहिवाशांना नवीन घरांच्या चाव्यांचे वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वितरण
वरळी, लोअर परळ आणि नायगावमधील १९५ बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू
गिरीश कांबळे, मुंबई
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लोअर परळ येथील पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ रहिवाशांना आता हक्काचे घर मिळणार आहे. अनेक वर्षांपासून छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या घराचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रहिवाशांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती आहे.
बीडीडी चाळींमधील रहिवाशांना पुनर्विकासानंतर ५०० चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे. विशेष म्हणजे, पात्र रहिवाशांना या सदनिका कोणतेही पैसे न घेता मालकी हक्काने दिल्या जाणार आहेत. या घरांची रचना दोन बेडरूम, हॉल आणि किचन (२ बीएचके) अशी आहे. नवीन इमारतींमध्ये रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक इमारतीत दोन प्रवासी लिफ्ट आणि एक अग्निशमन लिफ्ट आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, आग विझवण्याची यंत्रणा आणि भूकंपाचा धोका लक्षात घेऊन मजबूत बांधकाम करण्यात आले आहे.
लोअर परळमधील पहिल्या टप्प्यात सात विंग आणि एका रुग्णालयाच्या इमारतीचा समावेश आहे. त्यापैकी तीन विंगमधील ५५७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार विंगमधील ६८४ घरांचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दुसऱ्या टप्प्यातील १५ चाळींमधील सुमारे १२०० गाळेधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पात्र रहिवाशांना घर मिळेपर्यंत दरमहा ३० हजार रुपये संक्रमण भाडे दिले जाणार आहे.
मुंबईतील वरळी, लोअर परळ आणि नायगाव परिसरातील एकूण १९५ बीडीडी चाळींचा ८६ एकर जागेवर पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पातून एकूण १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. वरळीमध्ये आतापर्यंत १९७५, तर नायगावमध्ये १४०१ घरांचे वितरण झाले आहे. आता लोअर परळमधील ५५७ घरांच्या वितरणामुळे पुनर्विकासाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.