नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपांच्या प्रकरणाला नवे वळण
AIMIM नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप
Nida Khan TCS Case Accused Shelter Imtiaz Jaleel Update नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमधील टीसीएस प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचे आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या ठिकाणाबाबत आणि तिला मदत करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांकडून तपास सुरू होता. निदा खान हिला आश्रय देण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही करण्यात आला होता. या प्रकरणात एसआयटीने त्यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केल्याची माहिती आहे. आता या तपासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. इम्तियाज जलील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात त्यांची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. यासंदर्भात एसआयटीने न्यायालयालाही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पुरावे आणि संबंधित माहितीची तपासणी केली जात आहे. इम्तियाज जलील यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागू शकते. तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पार पडणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आरोप सिद्ध होणे बाकी आहे. त्यामुळे तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.