
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेलसमोर अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताचा तपास पालघर पोलिसांकडून सुरू आहे.
शनिवारी सकाळी भरधाव कार मुंबईच्या दिशेने जात असताना मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर पोहोचली. या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यावर सफेद पट्टे मारण्याचे काम सुरु असल्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. या मार्गावरून वाहनं वेगाने जात होती. याचवेळी समोर असणाऱ्या एका वाहनाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने या वाहनाला जाऊन जोरदार धडकली. त्यानंतर कारच्या पाठीमागून येत असलेल्या भरधाव वेगातील सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.
ट्रकच्या धडकेमुळे कारचा चक्काचूर झाला.अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मनोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
ग्लोरिया वेल्स(७३ वर्षे - महिला), क्लेटन वेल्स (४३ वर्षे - पुरुष), फॅबियोला वेल्स (४५ वर्षे - महिला) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. जखमीमध्ये लहान चिमुकल्याचा समावेश आहे. हेनान वेल्स (६३ वर्षे) आणि रेडन वेल्स (९ वर्षे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर मनोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी असून तपास करत आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बनला असून दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.