

नद्या दुथडी भरून वाहत असल्याने आणि पूल पाण्याखाली गेलेत.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांतील एकूण १३ रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी यांनी हा आदेश जारी केला आहे. यासह पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटनस्थळांवर प्रवेश बंद करण्यात आलेत.
सततच्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी, ओढे व बंधाऱ्यांवरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्नर–बेळेआळी ते लेण्याद्री पूल, बस्ती–सावरगाव पूल, निमगाव–निमदरी पूल, जुन्नर–वडज पूल, नारायणगाव–वारुळवाडी (नेवकर) पूल, नारायणगाव–वारुळवाडी (मेहेर) पूल, खोडद–रांजणी पूल तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील बंधाऱ्यावरील पूल.
लाखणगाव येथील घोडनदीवरील पूल (बेल्हा–जेजुरी महामार्ग), भराडी येथील बंधारा रस्ता, डिंभे–बोरघर रस्ता, डिंभे–भीमाशंकर रस्ता तसेच अडिवरे–अहुपे रस्ता. स्थानिक पातळीवरील पूरस्थितीचा आढावा घेऊन संबंधित तहसीलदार परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संबंधित रस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना बंद करण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर टाळण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी नियमानुसार प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले आणि अन्य पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स वॉटरफॉल (नाणेघाट), किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निमगिरी, आहुपे, डिंभे धरण, पोखरी घाट तसेच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे, धबधब्याखाली जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा चित्रीकरण करणे, मद्यपान करून अथवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकार वाहनचालक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडछाड करणे, मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, डीजे किंवा वाहनांवरील स्पीकर वाजविणे तसेच ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.