Eknath Shinde Government Cabinet Expansion: अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी पहिल्याच टप्प्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली असल्याचं बोललं जात आहे. या नाराजीतून दोन आमदारांमध्ये वाद देखील झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, शिंदे सरकारमधील तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
शिंदे सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion लवकरच पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये समान मंत्रिपदं वाटली जाणार आहे. यामध्ये शिंदे गटातील ७ आणि भाजपमधील ७ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला मंत्रिपद मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच शिंदे गटातील (Eknath Shinde) दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती साम टीव्ही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. उर्वरीत आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
काही आमदारांनी ‘गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे. अशातच मंत्रिपदावर दावा करणाऱ्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.