मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि तीन आरोपींचा जामीन रद्द केला
आरोपींना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश
मुदतीत शरण न आल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश
पाचव्या आरोपीला अटक
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डोंबिवलीचे शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि तीन आरोपींना मिळालेला जामीन रद्द करत त्यांना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दिलेल्या मुदतीत शरण न आल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली असून या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे हिला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
याआधी या प्रकरणातील आणखी एक महिला आरोपी प्रियांका उधमाळे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्यामुळे तिच्या अटकेची कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत संबंधित आरोपींविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, रमेश म्हात्रे यांना दिलेली आत्मसमर्पणाची मुदत संपण्यास काही तास उरले असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. म्हात्रे स्वतःहून पोलिसांसमोर हजर होतात की पोलिसांना त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे डोंबिवलीकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.