संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करत खोणी येथील पलावा परिसरातील डाऊन टाऊन आणि क्राऊन पलावा या इमारतींमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत यापैकी ८ जणांकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. तसेच ९ नायजेरियन नागरिकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अमली पदार्थ तस्करी आणि ड्रग्ससंबंधी गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांच्या कारवाईवेळी एका महिला नायजेरियन नागरिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे गुप्त माहितीच्या आधारे केली. पलावा परिसरात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापेमारी आणि कागदपत्र तपासणी मोहीम राबवली.
याप्रकरणी संबंधित नागरिकांच्या व्हिसा, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सुरू असून बेकायदेशीर वास्तव्यास मदत करणाऱ्या घरमालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले. या मोठ्या कारवाईमुळे पलावा परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.