शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी न चुकता जाणाऱ्या भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. १७ जूनपासून पुणे ते शिर्डी एक्स्प्रेस रोज धावणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वे स्थानकातून या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. शिर्डीला देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेष म्हणजे, पुणे रेल्वे स्थानक आणि विमानतळावर विविध भागांतून येणारे अनेक भाविक उतरतात. मात्र, पुणे ते शिर्डी दरम्यान थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे भाविकांना बस किंवा कॅबचा पर्याय निवडावा लागत होता. त्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास वाढत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून पुणे ते शिर्डी थेट रेल्वेची मागणी होत होती. आता ही सेवा सुरू होत असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 17 जून 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे ते शिर्डी दरम्यानची ही पहिली थेट रेल्वे सेवा ठरणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली भाविकांची मागणी यामुळे पूर्ण होत आहे. पुणे हे राज्यातील एक महत्वाचे शैक्षणिक, आयटी आणि ओद्योगिक केंद्र आहे. हिजवडी आयटी पार्क आणि चाकण ऑटो क्लस्टरसारख्या औद्योगिक भागांमुळे देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील लोक येथे पुण्यात येत असतात. तसेच शनिवार वाडा, आगाखान पॅलेस यांसारखी ऐतिहासिक स्थळे आणि लोणावळा, महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळांच्या जवळ असल्याने पुण्याला विशेष महत्व आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे श्रीसाईबाबांचे मूळस्थान असल्याने भारतातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. देशभरातून वर्षभर या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या लाखो भक्तांसाठी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक महत्त्वाची सेवा पुरवते. पुण्यापासून मिळणाऱ्या या नवीन थेट रेल्वे सुविधेमुळे भाविकांना मोठी सोय होईल आणि या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी - विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटनासाठी - हा एक सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी पर्याय ठरेल; तसेच यामुळे वृद्ध भक्तांचा प्रवासाचा त्रास कमी होईल. या सेवेमुळे अहिल्यानगर आणि शिर्डी येथील रहिवाशांना पुण्यातील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक जलद होईल. त्याचबरोबर, हॉटेल, टॅक्सी आणि विक्रेत्यांकडे येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे शिर्डी परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
दौंड कॉर्ड केबिन - पुणे - दौंड मार्ग आणि उत्तरेकडे जाणाऱ्या दौंड - मनमाड मार्ग यांच्या दरम्यान स्थानिक प्रवाशांसाठी अखंड आणि जलद वाहतूक सुनिश्चित करते.
श्रीगोंदा - स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना परवडणारी व जलद दळणवळण सुविधा उपलब्ध करून देते.
अहिल्यानगर - हे एक मोठे प्रशासकीय, लष्करी आणि व्यावसायिक केंद्र असून, येथे दररोज हजारो प्रवासी, नोकरदार वर्ग आणि लष्करी कर्मचारी ये-जा करतात.
राहुरी - हे एक नामांकित शैक्षणिक आणि कृषी केंद्र असून, येथे राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ, 'महात्मा फुले कृषी विद्यापीठ' स्थित आहे. येथील थांब्यामुळे विद्यापीठात ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना मोठा फायदा होईल. तसेच, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रवासाचीही सोय होईल.
बेलापूर - येथे या भागातील काही अग्रगण्य साखर कारखाने आहेत आणि हे प्रसिद्ध 'शनि शिंगणापूर' मंदिराकडे जाण्यासाठीचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे.
या सेवांच्या सुरू होण्यामुळे या भागातील दळणवळण सुधारण्यास, पर्यटन आणि व्यापारास चालना मिळण्यास आणि प्रवाशांची सोय होण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.