मुंबईतील CSC परिसरात ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू झाला
मृत व्यक्ती गोरडन कार्गो कंपनीतील कर्मचारी होते
CHA संघटनेने निषेधार्थ १७ फेब्रुवारीला कामबंद आंदोलनाची घोषणा केली
कुटुंबाने भरपाईची मागणी केली आहे
संजय गडदे, मुंबई
मुंबईतील कार्गो परिसरातील CSC (कार्गो सर्व्हिस सेंटर) येथे काम करत असताना, ट्रकच्या धडकेत गोरडन कार्गो कंपनीतील कर्मचारी गणेश लोटणकर यांचा १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण CHA कामगार संघटना हादरली असून, कार्गो परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटणकर हे नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार्गो परिसरात मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वर्दळ असताना पुरेशी सुरक्षा उपाययोजना, वेगळे पादचारी मार्ग, वेगमर्यादेचे काटेकोर पालन आणि देखरेखीची व्यवस्था का नव्हती, असा सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
कामगार संघटनेच्या मते, CSC परिसरात अनेक वेळा सुरक्षा त्रुटींबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सीसीटीव्ही नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी आणि स्पष्ट दिशादर्शक चिन्हे यांचा अभाव असल्याचीही टीका होत आहे. “कामगारांच्या जीवाशी खेळ करणारी ही बेपर्वाई आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेने दिली.
या घटनेच्या निषेधार्थ आणि स्वर्गीय गणेश लोटणकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी CHA कामगार संघटनेने १७ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे कस्टम क्लिअरन्ससह संबंधित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, “कामगारांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतेही काम मोठे नाही,” अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, मृताच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अदानी प्रशासन आणि कार्गो सर्व्हिस सेंटर व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर कार्गो परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामगारांच्या जीवित सुरक्षेबाबत प्रशासन किती संवेदनशील आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वर्गीय गणेश लोटणकर यांच्या निधनाने कार्गो क्षेत्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होऊन ठोस पावले उचलते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.