

फुलसावंगी येथे तान्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक दुर्घटना घडली.
दुर्घटनेनंतर महिलेला तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील उपचारासाठी जखमी महिलेला नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले
संजय राठोड, साम प्रतिनिधी
आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेच्या केसांसह डोक्याची चामडी निघाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्यानिमित्त येथे यात्रा भरत असते. या यात्रेत श्रीपुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील भावीक येत असतात. मात्र,या उत्साही वातावरणावर एका अत्यंत थरारक व अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेने विरजण पडले. बाली मारोती टाळीकोटे (वय 25 राहणार फुलसावंगी ) असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे.
दरम्यान बाली टाळीकोटे यांना तातडीने उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात नेण्यात आलंय. लोकवर्गणी करून महिलेवर उपचार केली जात आहेत. फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दरवर्षीप्रमाणे यंदाही तांन्हा पोळ्यानिमित्त एकदिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. यात्रेत विशेषतः महिलांची मोठी गर्दी होती. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
बाली मारोती टाळीकोटे ही महिला एका मोठ्या आकाश पाळण्यात बसल्या होत्या. पाळणा वेगाने फिरत असताना अचानक बाली टाळीकोटे यांचे लांब केस मागे असलेल्या पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने आणि बेरिंगचा आस फिरत असल्याने क्षणार्धात त्यांचे केस मोठ्या ताकदीने ओढले गेले. यात तिच्या डोक्यावरील केसांसह संपूर्ण त्वचा निघाली.
त्यानंतर महिला वेदनेने किंचाळल्याने आणि रक्ताच्या थारोळ्यात पाहून यात्रास्थळी एकच धावपळ आणि खळबळ उडाली. हा प्रकार पाहून यात्रेतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळासाठी यात्रेचा आनंदही अक्षरशः विरून गेला. सुदैवाने यात्रेच्या सुरक्षेसाठी तेथे तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि पोलीस जमादार सुहास कायटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ धाव घेतली. त्यांनी वेगाने फिरणारा पाळणा तातडीने थांबवला आणि अत्यंत कौशल्याने जखमी महिलेला बाहेर काढले. दरम्यान या अपघात प्रकरणी महागाव पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने आकाश पाळणा थांबवला. त्यानंतर जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढण्यात आले. तिच्यावर तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
यानंतर बाली टाळीकोटे यांना पुढील उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे यात्रेतील आकाश पाळण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.