

दुर्गम भाग. वर्षानुवर्षे सोयीसुविधांपासून वंचित. रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी नाही. आरोग्य व्यवस्था असली तरी नसल्यातच जमा. रुग्णवाहिका नाही. कधी ड्रायव्हर नाही. तर कधी ते वाहनच नादुरुस्त. अत्याधुनिक दवाखाने नाहीत. असले तरी तिथं पोहोचेपर्यंत माणसं प्राण सोडतात. कारण चांगले रस्ते नाहीत. गडचिरोलीच्या महिलेलाही वेळेत उपचार न मिळाल्यानं जीव गमवावा लागला.
गडचिरोली जिल्ह्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वेळेत उपचार न मिळाल्यानं कांदोळी येथील महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा, रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि एकूणच येथील विकासावर आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घरगुती कारणावरून वाद झाल्यानं कांदोळी गावातील महिला विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती बिघडली. तिला दुचाकीवरून बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिची प्रकृती खूपच खालावली असल्याचं एका सतर्क ग्रामस्थाच्या लक्षात आले. त्यानं क्षणाचाही विलंब न करता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी या महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यामुळं तिला पुढील उपचारासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेणे गरजेचे होते. पण तिथली आरोग्य व्यवस्था कोलडमली आहे हे प्रकर्षाने जाणवले. रुग्णवाहिका असली तरी तिथे चालक नव्हता.
वेळ न दवडता दक्ष नागरिकानं स्वतः रुग्णवाहिका चालवत महिलेला एटापल्ली येथे पोहोचवले. खराब आणि खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे महिलेला उपचारही वेळेत मिळू शकले नाहीत. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर महिलेला वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ऑक्सिजन पातळी सतत घसरत असल्याने तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळं अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुर्गम भाग असला तरी, तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध का होत नाही?
प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक जीवनरक्षक साधनसामग्री का उपलब्ध नाही?
कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि खराब रस्त्यांमुळे किती जीव घेणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.