

मुंबईत तरुणावर जीवघेणा हल्ला
कोयत्याने सपासप वार करण्यात आले
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
डोक्यात कोयता घुसलेल्या अवस्थेत तो रुग्णालयात आला
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांच्या मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यात कोयता घुसला. हा तरुण डोक्यात कोयता घुसलेल्या अवस्थेत स्वतः चालत सायन महापालिका रुग्णालयात पोहोचला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडिओतील दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. संबंधित तरुणाच्या डोक्यात कोयता घुसला आहे. एखादा नारळ तोडताना ज्या पद्धतीने कोयत्याचे घाव टाकले जातात तशाच पद्धतीने हा कोयता त्या तरुणाच्या डोक्यात घुसला. तसाच हा तरुण रुग्णालयात आला. गंभीर जखमी असूनही तो शांतपणे उभा आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल वापरत रुग्णालयात हा तरुण फिरताना देखील दिसत आहे. जखमी अवस्थेत तो स्वतःच रुग्णालयात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाची अवस्था पाहून रुग्णालयातील सर्वजण त्याच्याकडे पाहत राहिले.
या घटनेने दोन गंभीर प्रश्न ऐरणीवर आले आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेची तयारी. अशा गंभीर जखमी रुग्णाला तात्काळ स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर उपलब्ध होणे अपेक्षित असताना प्राथमिक क्षणी तशी सुविधा न मिळाल्याचेही व्हिडिओतून जाणवते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताच नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी जखमी तरुणावर तात्काळ उपचाराची चिंता व्यक्त केली आहे. “अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत भीती वाढते',” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
मुंबईत “सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप परत येईल का?” हा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेतून समोर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकाराने मानवी संवेदना, नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्य व्यवस्थेची तत्परता या तिन्ही मुद्द्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.