RSS at 100 Years
RSS at 100 YearsSaam TV Marathi

मी, संघ समजून घेताना...

RSS at 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांनी संघाच्या विचार, कार्यपद्धती आणि अनुभवांविषयी मांडलेले वैयक्तिक चिंतन. गैरसमजांपासून प्रत्यक्ष अनुभवापर्यंतचा त्यांचा प्रवास या लेखातून उलगडतो.
Published on

निरंजन वसंत डावखरे© ( लेखक कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार असून, भाजपाचे नेते आहेत. )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. संघ जगातील एक मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखली जाते. शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रा.स्व.संघावर सर्वत्र चर्चा होत आहे. संघाच्या वाटचालीचे विश्लेषण होत आहे. रा.स्व.संघाने आत्तापर्यंत केलेल्या कामाचा मागोवा घेतला जात आहे. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून मी समजून घेतलेल्या संघाविषयी...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव मला कळायला लागल्या पासून मी ऐकत आहे. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने विविध पक्ष, चळवळी आणि संघटना याची चर्चा घरी होत असे. माझे वडील स्व. वसंतरावजी डावखरे ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय होते. ठाण्यातील काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्यामुळे त्यांचा सगळ्यांशी संपर्क होता. नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे उपसभापती अशी वडिलांची प्रदीर्घ कारकीर्द होती. त्यांच्या सक्रिय कार्यकाळात ज्या चर्चा होत त्या रा.स्व.संघ मर्यादित स्वरूपात असे. वडिलांचा स्वभाव सगळ्यांना धरून रहाण्याचा होता. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यात ठाण्यातील त्यावेळचे काही ज्येष्ठ स्वयंसेवक निश्चित असणार.

वडील महापौर झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी त्यावेळी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अच्युतराव वैद्य आले होते. त्यावेळी अच्युतराव यांनी ठाणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कार्यक्रम दरवर्षीं करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सुचवले. महापौर म्हणून वसंतराव यांनी तात्काळ निर्णय घेतला. आणि त्यांच्या महापौरपदाच्या कार्य काळापासून ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वार्षिक कार्यक्रमातील एक विशेष कार्यक्रम म्हणून तो सुरु झाला. नित्यनियमाने तो दरवर्षी होत आहे. बहुदा डावखरे कुटुंब आणि रा.स्व. संघ ठाणे याचे नाते तिथून जुळले असावे.

त्यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते येत असत. आंदोलन, उपक्रम याची माहिती देत असत. स्व. वसंतराव मर्यादा सांभाळून सहकार्य करत असत. डॉ. सुधीर रानडे आवर्जून येऊन चर्चा करत असत. मी त्यावेळी कॉलेज मध्ये होतो. त्यामुळे एक अंतर होते.

RSS at 100 Years
Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

पण, मुळात रा.स्व. संघाविषयी गैरसमज अधिक होते. संघाविषयी अपप्रचार केला होता. संघ म्हणजे काही गूढ आहे अशी प्रतिमा तयार केली होती. संघ म्हणजे गुप्तता असे चित्र रंगवले होते. काँग्रसेने एका भीतीपोटी संघ द्वेष पोसला होता. संघाचे कार्य आणि कार्य विस्तार यामुळे काँग्रेस असुरक्षित होती. त्यातून संघाला कट्टर, मुलतत्ववादी ठरवले. काँग्रेसच्या या संघ विरोधी भूमिकेचा परिणाम सर्व दूर होता. दीर्घकाळ काँग्रेस सत्तेत होती. त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या गुडबुक्स मध्ये राहायचे असल्यास रा.स्व.संघाला विरोध केला पाहिजे; अशी मानसिकता तयार झाली. राजकीय पक्ष म्हणून भाजपला विरोध करताना रा.स्व.संघाचा द्वेष करण्याला प्राधान्य दिले गेले. संघावर टिका करणे, स्वयंसेवकांची खिल्ली उडवणे हे राजकीय कौशल्य मानले जाऊ लागले. यातून संघ म्हणजे काही तरी वेगळे प्रकरण आहे आणि त्यापासून दूर रहावे असा राजकीय प्रघात झाला. या सगळयाचा माझ्यावर परिणाम झाला असे मी म्हणणार नाही. माझ्या मनात कोणतीही अढी निर्माण झाली नाही. मी माझे कोणतेही विशिष्ट ठाम मत रा.स्व. संघाविषयी तयार केले नाही. संघाविषयी जे बोलले जात होते आणि मैदानात, विविध कार्यक्रमातून दिसणारा संघ वेगळा आहे हे निश्चित जाणवत होते. तरीही, तत्कालीन प्रवाहात असताना थोडेसे अंतर राहिले होते.

RSS at 100 Years
मोठी बातमी! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीची महत्त्वाची अपटेड समोर, ‘या’ १४ जिल्ह्यांना सर्वाधिक पैसे

दरम्यान देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत होती. काँग्रेस अंर्तगत वाद सुरु झाले. राष्ट्रीय राजकारणाचा प्रवाह वेगवान झाला होता. एक मोठी वैचारिक घुसळण होत होती. संघाचे स्वयंसेवक असलेले आणि प्रचारक राहिलेले आदरणीय श्री. नरेन्द्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. आणि, तिथूनच राजकारणाचा संदर्भ बदलला. उपेक्षित, वंचित माणसाचा विकास आणि समर्थ भारताची निर्मिती याला प्राधान्य देणारे राजकारण सुरु झाले. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही केवळ घोषणा न राहता, तो ठोस कृती कार्यक्रम झाला. अल्पावधीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला एक नवी ऊर्जा प्राप्त करून दिली. देशवासियांचा आत्मविश्वास उंचावला. त्याचवेळी महाराष्ट्रात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सरकारने पदार्पणातच दमदार कामगिरी केली.आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ध्येय - धोरणाने विविध पक्षातील राजकारणात सक्रिय असणारी आमची युवा पिढी प्रभावित झाली. मी त्यातील एक होतो. जनहिताचे आणि देशाच्या विकासाचे कल्पकतेने आणि पारदर्शीपणे होणारे काम परिणामकारक ठरू लागले होते. बदलाचा वेध घेऊन आणि एका व्यापक हिताचा विचार करून मी भाजपात प्रवेश केला. भाजपाची वैचारिक भूमिका म्हणजे रा.स्व.संघ हे माहिती होते. संघ हा भाजपचा सैद्धांतिक आधार आहे; याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षात सक्रिय झालो.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम सुरु केल्यावर रा.स्व. संघ समजून घेण्यासाठी वेळ देऊ लागलो. संघाची पुस्तके, नियतकालिक वाचण्यास सुरुवात केली. काही ज्येष्ठ स्वयंसेवकांना भेटून त्यांचे अनुभव ऐकले. संघ प्रचारकांना भेटून संघ जाणून घेतला. उदयॊग, कला, सामाजिक क्षेत्र येथे विशेष कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांशी चर्चा केली. संघ विचारांच्या अभाविप, वनवासी कल्याण आश्रम, संस्कार भारती, जनकल्याण समिती या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून संघ भूमिका लक्षात घेतली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या काही अभ्यासवर्गात सहभागी झालो. या सगळ्यातून संघ विचार, कार्यपद्धती आणि कृती समजून घेत होतो. संघ विधायक, सकारात्मक आणि सगळयांचा आहे हे लक्षात आले.

केशवसृष्टी येथे झालेल्या स्वयंसेवकांच्या प्राथमिक संघ शिक्षा वर्गात पूर्णवेळ सहभागी झालो होतो. हा दहा दिवसांचा काळ उपयुक्त ठरला. संघाचे अंतरंग बघता आले. जात, भाषा, आर्थिक आणि सामाजिक स्तर या पलीकडे जाऊन एकत्वाच्या भावनेने रहाणारे आणि बंधुभावाचे दर्शन घडवणारे स्वयंसेवक, त्यांच्या व्यवहारातून संघ नेटकेपणाने कळला. या वर्गात झालेल्या विविध सत्रातून संघ समाज आणि देश याचा सूक्ष्म आणि प्रभावी विचार करतो हे दिसून आले. प्रत्येक व्यक्तीला सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित करून देशाच्या उत्कर्षासाठी कार्यप्रवण करण्यावर संघाचा भर आहे हे लक्षात आले. संघ पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहून राष्ट्रकारण केंद्रित आहे हे समजून घेता आले. या वर्गातून माझी संघ समजून घेण्याची प्रक्रिया गतिमान झाली, असे निश्चितपणे म्हणता येईल.

RSS at 100 Years
Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

एक लक्षात घेतले पाहिजे मी, संघाचा बाल स्वयंसेवक नाही. महाविद्यालयीन जीवनात संघात गेलेलो नाही. मी राजकीय क्षेत्रातून संघात आलो आहे. त्यामुळे माझी संघाची ओळख करून घेण्याची प्रोसेस वेगळी आहे. मी कोकण पदवीधर मतदार संघाचा आमदार आहे. ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात माझ्या प्रवासात त्या भागात संघ रुजवणाऱ्या आणि संघाचा प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ स्वयंवसेवकांना भेटून संघाचा विकासक्रम मी जाणून घेतो. संघाच्या विविध बैठकांचे मला निमंत्रण असते. तेथील वातावरण, शिस्त, विषयांची नेमकी चर्चा यातून संघ संस्कारांचे दर्शन होते. संघाच्या कार्यक्रमाचे नियोजन रेखीव असते. गॉसिपिंगला संघात स्थान नाही. ज्यातून काही निष्पन्न होणार नाही त्यावर बोलले जात नाही. जेवढे करू शकतो तेवढीच चर्चा असा संघ आहे. संघाची घरं, कुटुंब स्वागतशील आहेत. एक आपुलकीचे आदरातिथ्य अश्या घरातून असते. बडेजाव नाही. इम्प्रेस करण्याची धडपड नाही. सेल्फीसाठी धावपळ नाही. हा संघाचा गुण आहे. त्या गुणाचा अनुभव मी घेत आहे.

रा.स्व. संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह, पाचवे सरसंघचालक के.सी. सुदर्शन आणि सहावे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे जीवन कार्य मी जाणून घेत आहे.

१९२५ ते २०२५ अशी संघाची बहुपेडी वाटचाल मी अभ्यासत आहे. देशाच्या विविध भागात राष्ट्रीय एकात्मता, समरसता, आर्थिक समानता आणि मूल्यांची जपणूक यासाठी संघ आवश्यक ते सगळं करत आहे. कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी देशभर केलेले सेवा कार्य विलक्षण होते. आपत्ती काळात धावून जाणे आणि आवश्यक ती सर्व मदत करणे हा संघाचा यूनिकनेस आहे. "वाद नाही संवाद" ही संघाची नीती आहे. विरोध नाही तर, समावेशकता हे संघ धोरण आहे. सगळे समान आहोत हा भाव जपत संघ पुढे जात आहे.

कोकण पदवीधर निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यातील संघाच्या स्वयंसेवकांचा उस्फुर्त आणि शिस्तबद्ध सहभाग मी जवळून पाहिला आहे. मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी निर्लेपपणाने केलेले काम निश्चित अनुकरणीय आहे.

RSS at 100 Years
धक्कादायक! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा बुधवार पेठेत पाठवले, पुण्यातील धक्कादायक घटना

मी आणि माझ्या सारखे संघ समजून घेणारे तत्वज्ञानापेक्षा व्यवहार यातून संघ समजून घेत आहोत. आमच्यासमोर सामान्य स्वयंसेवकांच्या असामान्य व्यवहाराचा आदर्श आहे. देव, देश आणि धर्मासाठी आपला खारीचा वाटा उचलणारे स्वयंसेवक ही संघाची पुंजी आहे. संघ हीच पुंजी वृद्धिंगत करून देशाची सेवा करत आहे. राष्ट्र प्रथम याची जपणूक करणारा संघ मी समजून घेत आहे. संघासारख्या संघटना समजल्या असे होत नाही. या अश्या संस्था आपण जितके समजून घेऊ तितक्या उलगडत जाणाऱ्या आहेत. शताब्दी पूर्ण करणाऱ्या रा.स्व. संघाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com