

नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे
नाशिकच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
पक्षातील संभाव्य पक्षांतर रोखण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू
ठाकरे सेनेचे सहा खासदार फोडून एकनाथ शिंदेंनी 2022 नंतर दुसरा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना दिलाय. यापुढेही अजून धक्के बसणार असल्याचा इशारा शिंदेसेनेने दिल्याने ठाकरेसेना सावध झाली आहे. नाशिक महापालिकेमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा असतानाच ठाकरे सेनेनं डॅमेज कंट्रोलचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
यासाठीच नाशिकमधील सर्व 15 नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली. यावेळी नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. नाशिक हे निष्ठावंतांचे शहर आहे. कुणीही फुटणार नाही याचे वचन आम्ही उद्धव ठाकरेंना दिलंय, अशी माहिती नाशिकचे ठाकरेसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी दिली.
या बैठकीतील इनसाईड स्टोरी साम टीव्हीच्या हाती आली आहे. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करताना काय म्हणाले पाहूया. मला नाशिककरांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही. याचा मला कायम विश्वास आहे. काही खासदार पक्ष सोडून गेले. मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले. नाशिकचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल. मी नाशिकला कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी येणार आहे.
खासदार फुटल्यानंतर आमदार आणि मुंबई महापालिकेचे नगरसेवकही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी २२ जून रोजी मुंबईतील 'शिवालय' या संपर्क कार्यालयात पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे विधानसभेचे ३ आणि विधानपरिषदेचा १ असे एकूण ४ आमदार गैरहजर होते. त्यामुळे या चर्चांना अधिकच धार आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ठाकरे कसे रोखणार ? नगरसेवक एकनिष्ठ राहणार की निधीच्या नावाखाली सत्तेच्या वळचणीला जाणार ? याकडे राज्याचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.