

टिटवाळ्यात सफाई कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल
सफाई कर्मचाऱ्याने थेट गटारात उतरून मैला काढावा लागल्याचे समोर आलंय
सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांचा संताप
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
टिटवाळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिटवाळ्यातील दळवीवाडा परिसरातील अमृतसिद्धी रोड आणि सुमुख सोसायटीजवळ सफाई कर्मचाऱ्यांना थेट गटारात उतरून मैला काढावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर केडीएमसीच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गटारातील साचलेला मैला आणि कचरा काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही यांत्रिक साधनांचा वापर न करता थेट गटारात उतरविण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांकडे पुरेशी सुरक्षा साधने किंवा संरक्षणात्मक उपकरणे नसल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. थोडेसे पैसे वाचविण्यासाठी कामगारांचा जीव धोक्यात टाकण्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.
देशात हाताने मैला उचलण्यास आणि अशा धोकादायक पद्धतीने गटार सफाई करण्यास कायद्याने बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून सफाईची कामे करून घेतली जात असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित व्हिडिओ प्रशासन आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गटार सफाईची कामे पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने करण्यात यावीत, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्यावीत आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का? संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याकडे आता टिटवाळावासीयांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.