संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
Tamil Nadu CM Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चेन्नई पोलिसांनी जळगावमधून एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन असे आरोपीचे नाव आहे. तो होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.
मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन हा विजय यांच्या नावाने एआय (AI) जनरेटेड व्हिडिओ आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करत होता. चेन्नई पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईमच्या पथकाने नशिराबाद पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद जुनेद याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट (फेक) अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून तो मुख्यमंत्र्यांचे AI व्हिडीओ तयार करत होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी चेन्नई येथील वेस्ट झोन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चेन्नई सायबर क्राईमचे पथक नशिराबादेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. या बनावट अकाउंटचे इंटरनेट लोकेशन (IP Address) जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे असल्याचे समोर आले. धागेदोरे मिळताच चेन्नई सायबर क्राईमचे एक विशेष पथक तातडीने जळगावात दाखल झाले. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर माहिती काढून पोलिसांनी संशयित होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला ताब्यात घेतले.
पुढील तपासासाठी चेन्नईला रवाना
नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलीस आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपीला सोबत घेऊन चेन्नईकडे रवाना झाले आहेत. एका स्थानिक होमगार्डने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाऊंट चालवल्याचे उघडकीस आल्याने जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बनावट अकाउंटमागे आरोपीचा काय उद्देश होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास चेन्नई पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.