

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरी एसआयटीचं पथक दाखल झालं होतं. 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या या पथकाने जरांगे यांच्याकडून ऑडिओ क्लिप घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिलीये. तसंच क्लिपचा मूळ सोर्स देण्यास नकार दिला. सोर्स दिल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.
एसआयटीचे पाटील साहेब आणि त्यांची टीम क्लिप घेण्यासाठी आली होती. माझा जबाब वगैरे असा काही प्रकार नव्हता. पण क्लिप घेण्याची प्रक्रिया बराच वेळ सुरू होती. मी त्यांना क्लिपचा सोर्स देऊ शकत नसल्याचं सांगितलं. क्लिप हवी असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोर्स देणाऱ्या व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी घ्यावी, असेही जरांगे म्हणाले.
जरांगे यांनी पुढे सांगितलं की, यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या चौकशीचीही मागणी केली. माझ्याआधी रामदास कदम यांनी ही क्लिप वाजवली होती. त्यामुळे मला क्लिप देणारी व्यक्ती आणि त्यांना क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची दाट शक्यता आहे. मग रामदास कदम यांची चौकशी का होऊ नये? त्यांना ही क्लिप कोणी दिली, हेही तपासले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतलाय. मराठा समाजाच्या विरोधात हा खूप मोठा डाव होता. या संकटाला मी पुढे जाऊन सामोर गेलोय. यामुळे मला गेल्या तीन वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागला. आंदोलन मोडायचं आणि मला बदनाम करायचं, असे जाहीरपणे नियोजन केलं जात होतं. काही लोक फक्त आरोप करून मोकळे होत होते. 'शरद पवार मागे आहेत, टोपे माझा आहे,' असे संभाषणात बोलले जात होते. तसंच 'आपल्याकडे काय कमी आहे, भाजपचा पार्टी फंड वापरा,' असंही बोललं जात होतं, असे जरांगे यांनी सांगितले.
माझा प्रामाणिकपणा यांना का खपत नाही? सरकारचे पैसे घेऊन मला माझ्या मुलांना अन्न खाऊ घालायचं नाही. सरकारचे पैसे घेतल्याशिवाय कोणीही आंदोलनाच्या विरोधात बोलूच शकत नाही. आता जरांगे पाटलांच्या विरोधात बोला आणि पैसे घेऊन जा, अशी नवीन मोहीम सुरू झाली आहे. सरकारकडून ज्यांनी पैसे घेतले आहेत, ते माझ्याकडे येत नाहीत, असेही ते म्हणाले.
सध्या मला मदत करणारे मंत्री आणि आमदार यांच्याबाबतही जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. मी आता ही नावे बाहेर काढली तर त्यांना दारातही उभं करणार नाही. माझ्याकडे खूप महत्त्वाचे पुरावे येऊ लागले आहेत. सरकारकडून कोणी कोणी पैसे घेतले, यांची नावे पुढील दीड महिन्यात समोर येतील, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाने ज्याला मोठे केले, तोच आता आपल्या लेकराबाळांचे नुकसान करायला निघाला आहे. पदाचा गैरवापर करून आपल्या मुलांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. 'माझ्या नादाला लागू नको, शहाणा हो. माझी पहिलीच राख झालेली आहे. तुझं राजकीय करिअर बरबाद करू नको,' असा इशाराही त्यांनी दिला. आता आमची भीती मरून गेली आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी बीडमधील नारायण गडमध्ये दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या कथित क्लिपमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये देण्यात आले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही रक्कम मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा उल्लेख संभाषणात होता.
तसंच जरांगे यांचं आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संभाषणात ऐकू येत होते. पण जरांगे यांनी आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचं सांगितलं होतं. या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.