

देशातील हवामानात सतत चढ-उतार होत आहे. काही राज्यात थंडीचा कहर तर काही ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे. आजही हवामान खात्याने ५ राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हवामानातील बदल सुरू आहे. तर काही राज्यांमध्ये थंडीचा कहर सुरू आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे थंडी प्रचंड वाढली आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे थंडी यामुळे नागरिकांचा हाल होत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल येथे मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि केरळमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
महाष्ट्रात थंडीची प्रतीक्षा लांबली आहे. आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा परिणाम झाला आहे. पुढचे चार ते पाच दिवस तापमानात मोठे बदल होणार नाहीत. नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुणे शहरासह राज्यात अद्याप अपेक्षित थंडी जाणवत नसल्याने नागरिकांची प्रतीक्षा लांबली आहे. काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन गारठा वाढला होता, मात्र आता पुन्हा थंडी गायब झाल्याचे चित्र आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव मंदावला असून, आग्नेय व पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे. या बदलत्या वाऱ्यांचा प्रवाह आणि ‘एल निनो’च्या स्थितीमुळे रात्रीचे तापमान चढेच राहत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी सकाळी धुकेसदृश वातावरण आणि काही प्रमाणात ढगाळ स्थिती निर्माण होत आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला आणि विशेषतः २१-२२ तारखेच्या आसपास उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आकाश निरभ्र असल्याने रात्रीच्या तापमानात मोठी घट होऊन पुण्यासह राज्यातील काही भागांत पारा ८ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र, सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा जोर ओसरला आहे. मात्र आता दक्षिणेकडून आणि आग्नेय आणि पूर्व भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र किनारपट्टीसह इतर भागांत आर्द्रता वाढली आहे.
पुणे आणि परिसरात बुधवारी किमान तापमान १६ अंश, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर आज किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे. डिसेंबरमधील थंडीची तीव्रता आता उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि पश्चिमी विक्षोभांच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.