नाशिक: राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणाऱ्या शिवसेना फुटीनंतर उद्भवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा येत्या रविवारी (दि. २८ जून) सिन्नर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी सत्ताधारी गटाची वाट धरली. या राजकीय उलथापालथीच्या काळात अनेक नेत्यांप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यापुढेही विविध राजकीय प्रस्ताव आल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मंत्रीपद, विकासनिधी आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑफरसह विविध आमिषे देण्यात आल्याच्या चर्चा सुरू असतानाही त्यांनी पक्षाशी आणि आपल्या राजकीय भूमिकेशी तडजोड न करता निष्ठावंत राहण्याचा निर्णय घेतला.
राजकीय लाभाच्या गणितांपेक्षा विचार आणि निष्ठेला प्राधान्य देणारा त्यांचा हा निर्णय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरला. बदलत्या राजकीय समीकरणांच्या आणि पक्षांतराच्या काळात स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात आले. सामाजिक माध्यमांवरही त्यांच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले असून अनेकांनी त्यांना "निष्ठेचे प्रतीक" अशी उपमा दिली. दिल्लीतील संसदीय कामकाज पूर्ण करून खासदार वाजे नाशिकमध्ये परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील विविध भागांत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत हजारो नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. या स्वागत सोहळ्याची राज्यभर चर्चा झाली होती.
याच पार्श्वभूमीवर आता सिन्नरमध्ये आयोजित करण्यात आलेला नागरी सत्कार हा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिन्नर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका लोकप्रतिनिधीच्या निष्ठावंत भूमिकेचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिन्नर शहरातील ज्वालामाता कार्यालय येथे रविवारी दुपारी ४ वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात राहणार आहेत. तर माजी आमदार विलास लोणारी यांच्या हस्ते खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
दंगलकार नितीन चंदनशिवे यांची शाब्दिक मेजवानी
कार्यक्रमात प्रसिद्ध कवी व वक्ते दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते यावेळी विशेष व्याख्यानही देणार आहेत. सामाजिक आणि राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर निष्ठा, विचार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी या विषयांवर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार
दरम्यान, या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून काही सत्ताधारी पक्षातील नेतेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा ठरण्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिकूल परिस्थिती ठाम राहिल्याने शुभेच्छा वर्षाव
राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना विचारांशी आणि पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा नागरी सत्कार नाशिक जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांमध्येही या सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता असून सिन्नरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.