डिलिमीटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पक्षात फूट पडू नये आणि पक्ष एकसंघ राहावा, यासाठी मोदी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यामार्फत पक्षातील अंतर्गत परिस्थितीची माहिती काँग्रेसला देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश खासदार आधीपासूनच केंद्र सरकारच्या संपर्कात असून, त्यांनी डिलीमीटेशन विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतल्याचं काँग्रेसला कळवण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पक्षात फूट पडू नये आणि पक्षाची एकजूट कायम राहावी, यासाठी सरकारला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची भूमिका संबंधित नेत्याने काँग्रेससमोर मांडल्याची माहिती आहे. दरम्यान, या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पक्षाच्या खासदारांची नेमकी भूमिका काय असणार, खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल आणि परिसीमन विधेयकावर पक्ष अंतिम निर्णय कोणता घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
केंद्र सरकारकडून संसदेत मांडल्या जाणाऱ्या डिलीमीटेशन विधेयकात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या सध्याच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करून एकूण जागा ८५० पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये राज्यांसाठी लोकसभेच्या कमाल जागा ५३० वरून ८१५ करण्याचा, तर केंद्रशासित प्रदेशांसाठी जागा २० वरून ३५ करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभांमधील सदस्यसंख्येतही वाढ करण्याची तरतूद असून, कमाल सदस्यसंख्या ५०० वरून ६५० करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या विधेयकातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे महिला आरक्षण. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हे आरक्षण लागू करण्याची तरतूद असल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.