

उरी सेक्टरमधील आर्मी कॅम्पमध्ये हँड ग्रेनेडचा स्फोट
दोन जवान शहीद झाले
या जवानांमध्ये साताऱ्याच्या सुपुत्राचा समावेश
साताऱ्यातील कराड येथील अर्जुन राजेंद्र जाधव शहीद
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये स्फोटाची भयंकर घटना घडली. उरी सेक्टरमध्ये आर्मीच्या कॅम्पमध्ये हँड ग्रेनेडचा स्फोट होऊन २ जवान शहीद झाले. यामधील एक जवान साताऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील कराडच्या सुपुत्राला वीरमरण आल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही भयंकर घटना उरी सेक्टरच्या कमलकोट भागातील आर्मी कॅम्पमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहापूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद झाला. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवानाला वीरमरण आले. अर्जुन राजेंद्र जाधव (३० वर्षे) असं या जवानाचे नाव होते. हँड ग्रेनेडच्या स्फोटात ते आणि आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. सध्या ते काश्मीरमध्ये 8 RR मध्ये कार्यरत होते.
अर्जुन जाधव यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शहापूर या मूळगावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २५ जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते १५ जूनला सुट्टीवर येणार होते. त्या अगोदरच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.
आर्मी कॅम्पमध्ये नेहमीप्रमाणे जवान शिफ्ट बदलल्यानंतर आपल्याकडे असलेली शस्त्र आणि लष्करी साहित्य दुसऱ्याच्या ताब्यात देतात. त्याचवेळी ही घटना घडली. याचवेळी एका हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात कर्तव्यावर असलेले २ जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना तात्काळ लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.