ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. लातूरमधील एका संस्थेच्या 25 कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी संजय शिरसाट यांनी नरसिंग उदगीरकर यांना घरी बोलावून 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा राऊत यांनी एक्सवरील पोस्टमधून केला. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांवर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिरसाट म्हणाले की, माझ्यासाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी त्यांनी कधीही माझ्याविरोधात तोंड उघडले नव्हते. मात्र, गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे त्यांना आता संजय शिरसाट अडचणीत आला आहे, असे वाटत असावे. त्यामुळेच ते माझ्यावर आरोप करत आहेत.
लातूरमधील उदगीरकर नावाच्या व्यक्तीने 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव माझ्याकडे दिला होता. अनेक प्रस्ताव माझ्याकडे येत असतात. काही प्रस्तावांना मान्यता दिली जाते, तर काहींना दिली जात नाही. ही प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, 25 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मला मंत्री म्हणून 10 कोटी रुपयांपर्यंतचेच अधिकार आहेत. 10 कोटींच्या पुढील प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते. त्यामुळे 25 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सही आवश्यक असते, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले.
अण्णाभाऊ साठे यांचे योगदान काय आहे, याची आम्हाला जाणीव आहे. कोणत्याही महापुरुषाचे नाव राजकारणासाठी वापरायचे आणि प्रकरण घडले नाही तर महापुरुषांची बदनामी करायची, हा नवा प्रकार कुठून आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचे काम आम्ही केले आहे. देशात नसेल असे भव्य स्मारक उभारत आहोत. चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 90 कोटी रुपये खर्च करत आहोत. त्यामुळे महापुरुषांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी करू नये, असेही शिरसाट म्हणाले.
उदगीरकर यांनी माझ्या पीएला फोन केला होता. ते माझ्यावर बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगत होते. त्यांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने आम्ही त्याचे रेकॉर्डिंग केले आहे. या प्रकरणात माझ्याकडे ऑडिओ क्लिप असून, त्यातून नेमके काय घडले हे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.