पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे विभागातील पायाभूत सुविधांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुणे विभागात तब्बल ५० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
बैठकीदरम्यान पाच महत्त्वाच्या प्रकल्पांचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. त्यामध्ये पुणे-शिरूर कॉरिडॉर हा ५४ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यासाठी सुमारे ७ हजार ५१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ५३ किलोमीटरचा रस्ता सुमारे ४ हजार कोटी रुपयांत उभारला जाणार असून त्यासाठी निविदाही निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे-सोलापूर (हडपसर-यवत) हा ३१ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच नाशिक फाटा ते खेड या मार्गासाठी सुमारे ७ हजार ८०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर Pune ते Chhatrapati Sambhajinagar हे अंतर अवघ्या सव्वा दोन तासांत पार करता येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पुणे शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली असल्याने शहराला वाहतूकमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वाळू आणि दगड यांसारख्या साहित्याच्या किंमती राज्य सरकारने माफ करण्याची विनंतीही केंद्राकडून करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर परिसरातील काही रस्ते प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई ते बंगलोर नवीन महामार्ग उभारण्याचीही योजना असून हा महामार्ग Jawaharlal Nehru Port Trust जवळून सुरू होऊन पुण्यातून जाणार आहे. दरम्यान, देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून पुढील महिन्यात त्याचे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
तसेच कात्रज उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुणे रिंगरोड प्रकल्प राज्य सरकारकडून राबवला जात आहे. याशिवाय पुणे-सातारा रस्त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात येणार असून पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या सुधारणा कामांनाही गती देण्यात येणार आहे. तसेच पुढील महिन्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.