

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकारी वसतिगृहांशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असून, गेल्या 10 दिवसांहून अधिक काळ ते उपोषण करत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेलं पत्र आणि विद्यार्थ्यांचे निवेदन शेअर केलंय. पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या भेटीत विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अनेक समस्यांची माहिती दिल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी वसतिगृहात राहण्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा लागू करण्यात येतेय. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि भविष्यातील तयारीवर परिणाम होऊ शकतो. अनेक आदिवासी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करतायत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यास त्यांना वसतिगृहात राहता येणार नाही.
दुर्गम आणि ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणारे अनेक आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहांवरच अवलंबून असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठी अडचण निर्माण करणारा ठरू शकतो, असं राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केलंय. विद्यार्थ्यांनी या वयोमर्यादेसह इतर काही नियमांविरोधात उपोषण सुरू केलंय.
राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींसाठी करण्यात येणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्यांवरही गंभीर आक्षेप घेतला आहे. मोठ्या सुट्टीनंतर वसतिगृहात परतणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांची ‘फिटनेस’ सिद्ध करण्यासाठी प्रेग्नेंसी टेस्टसह इतर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.
हा नियम विद्यार्थिनींच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर आघात करणारा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. विद्यार्थिनींना सुरुवातीपासूनच संशयाच्या नजरेने पाहून त्यांना दोषी असल्यासारखी वागणूक देणं अपमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. अशा नियमांमुळे विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांवर आणि सन्मानावर परिणाम होत असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी सरकारी वसतिगृहांच्या खराब स्थितीचाही मुद्दा उपस्थित केलाय. अनेक ठिकाणी वसतिगृह सुरक्षित नसून विद्यार्थ्यांना पुरेसं आणि चांगलं अन्न मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचीही मोठी कमतरता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना साप चावण्यासारख्या घटनांचाही सामना करावा लागलाय. अशा घटनांमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं तर काहींना आपला जीव गमवावा लागल्याचेही राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही अत्यंत गंभीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
हे विद्यार्थी कोणतीही दया मागत नसून त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे, असं राहुल गांधी यांनी म्हणणं आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित वसतिगृह आणि योग्य सुविधा मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीये. वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, विद्यार्थिनींच्या वैद्यकीय चाचण्या आणि वसतिगृहांतील असुरक्षित परिस्थिती या सर्व प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, असंही त्यांनी पत्रातून म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.