

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका
सीएनजीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढला
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्याना बसणार महागाईची झळ
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना पहाटे ६ वाजता मोठा धक्का दिला आहे. राज्यासह संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. देशातील विविध भागात पेट्रोल ३.१४ रुपये आणि डिझेलचा दर ३.११ रुपयांनी वाढला आहे. तेल कंपन्यांनी मध्यरात्री पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत इमेल करून माहिती दिली. दूध, सीएनजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पे्ट्रोल-डिझेल दरवाढीचे परिणाम दिसून येतील.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. याआधी अमूल आणि मदर डेयरी कंपन्यांनी दूधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली. सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलचे नवे दर 93 रुपये तर मुंबईत पेट्रोलचे नवे दर 106.50 रु. ते 106.54 रुपये आहे.
परभणीत इंधन दरवाढीचा भडका
परभणीकरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परभणीत पेट्रोलचा दर 105.50 वरून थेट 108.63 प्रति लिटरवर पोहोचला असून ₹3.13 ने वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर 92.2 वरून 95.13 प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे 3.11 रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. पेट्रोल डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे वाहनधारक, सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. इंधन दरवाढीचा परिणाम मालवाहतूक, भाजीपाला तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. आधीच वाढत्या महागाईने नागरिक हैराण असताना इंधन दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर होत आहे. येत्या काळात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दरवाढीमुळे शहरासह ग्रामीण भागातही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावतीत महागाईचा बॉम्ब
अमरावतीतही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. अमरावतीत पेट्रोलचे दर 108 रुपये 24 पैसे प्रति लिटर तर डिझेल 94 रुपये 74 पैसे इतक्या रुपयांवर पोहोचले आहेत. मध्यरात्रीपासून अमरावतीमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 3 रुपये 13 पैशांची वाढ झाली आहे. यापूर्वी अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर 104 रुपये 11 पैसे तर डिझेल 91 रुपये 63 पैसे इतके होते. भारत आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता शेतीच्या मशागतीची वेळ असताना पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.