

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
NCP merger latest news Maharashtra : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांची वक्तव्ये आणि भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यामुळे 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?' अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू असतानाच, बीडमध्ये मात्र दोन्ही गटांचे नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बीडमधील दुष्काळ निवारणासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते. मनकर्णिका धरणावर 'गाळपेरा' कार्यक्रम पार पडला असून, या कार्यक्रमाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे नेते राजकीय जोडे बाजूला सारत एकाच व्यासपीठावर आले. बीडच्या मनकर्णिका धरणावर आज ‘गाळपेरा’ उपक्रमांतर्गत हा मेळावा पार पडला. "दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावर गट-तट न बघता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे," असे या वेळी नेत्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र पाहायला मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील मनकर्णिका धरणावर आज गाळपेरा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे तिन्ही नेते एकत्र आले होते. मात्र, या कार्यक्रमाला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. तरीही नेत्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत हा केवळ दुष्काळमुक्तीसाठी केलेला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.
नेत्यांची नेमकी भूमिका काय? कोण काय म्हणाले?
खासदार बजरंग सोनवणे (शरद पवार गट):
गाळपेरा हा अत्यंत चांगला उपक्रम असला, तरी शासनाने आमच्या मागणीनुसार अजूनही ठोस उपाययोजना राबवलेल्या नाहीत. शासनाने लवकरात लवकर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवून बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना, "हा मतदारसंघ दादा गटाच्या आमदाराचा आहे आणि मी पवार साहेबांचा खासदार आहे. यात राजकारण नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार विजयसिंह पंडित (अजित पवार गट):
"बीडजिल्ह्यात सध्या भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा बिकट परिस्थितीत पशुधन वाचवण्यासाठी गट-तट आणि पक्ष बाजूला सारून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही," असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन केले.
राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी SP):
बीडजिल्ह्यात तीव्र पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली असून गावोगावी पाणी आणि चारा विकत घ्यावा लागत आहे. पशुधन टिकले तरच शेतकरी उभा राहील, म्हणूनच हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर कार्यक्रमाला न येण्याबाबत बोलताना, "हा भाग गेवराई मतदारसंघात येतो आणि संदीप क्षीरसागर हे सुद्धा सध्या ग्रामीण भागात फिरून दुष्काळग्रस्त नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहेत," असे स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.