नाशिक शहरात फिजिक्सवाला या खाजगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाला चोप दिला होता. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात मनसेच्या पाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शरणपूर लिंकरोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरातील फिजिक्सवाला विद्यापीठ या खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना हिंदीतच बोलण्याची आणि शिक्षण घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या क्लासवर धडक देत याबाबत जाब विचारला. येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याने मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या कानशिलात लगावल्याने वातावरण चांगलेच तापले होते. आठ दिवसांत शिक्षणपध्दतीत बदल न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार गेल्या काही दिवसांपासून फिजिक्सवाला विद्यापीठ या खासगी कोचिंग क्लासमध्ये नियुक्त शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना हिंदीत बोला, मराठी ही कुठली भाषा आहे. मराठी ही गावठी भाषा आहे, अशाप्रकारचे अपमानास्पद शब्द वापरून मराठीचा अपमान करत होते. याबाबत क्लासच्या विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.११) कोचिंग क्लासला भेट देत जाब विचारला. क्लासमधील सर्व विद्यार्थी मराठी असताना परप्रांतीय शिक्षकांचा भरणा का केला, क्लासमध्ये मराठी शिक्षक किती आहेत याबाबत मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा करण्यात आली. मात्र, यावर व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.
क्लासमध्ये सर्व विद्यार्थी मराठी असल्याने मराठी शिक्षकांचा भरणा करा, अशी सूचनाही यावेळी मनसेकडून करण्यात आली. क्लासच्या वरिष्ठ संचालकांनाही याबाबत फोनवरून कळविण्यात आले. याचवेळी ज्या अभिनव नावाच्या परप्रांतिय कर्मचाऱ्याकडून मराठीबाबत अपशब्द वापरण्यात आले होते त्याला तातडीने बोलवा, अशी मागणी करण्यात आली. हा कर्मचारी केबिनमध्ये आल्यावर त्याला मराठी भाषा गावठी आहे का, असा जाब मनसे कार्यकर्त्यांनी विचारला. मात्र, मी असे बोललोच नाही असे उत्तर या कर्मचाऱ्याने दिल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. अखेर संतप्त पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावत मराठीचा अपमान सहन करणार नाही, असे खडे बोल सुनावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.